Monday 11 September 2017

Thursday 25 August 2016

यंदा ४ थी व ५ वीत शिकत असलेले माझे विद्यार्थी इंग्रजी विषयाचा अभ्यास पुढीलप्रमाणे करतात.

१.सम्बंधित इयत्तेतील सर्व विद्यार्थी त्या इयत्तेचा शब्दकोष (Reader) व पाठ्यपुस्तक घेवून चटईवर गट करून वर्तुळाकार बसतात.(प्रत्येक वर्गाची पटसंख्या सरासरी 6-7 अशी असल्याने प्रत्येक इयत्ता म्हणजे एक गट सहज बनतो)

२.पाठ्यपुस्तकातील गद्यपाठाचे वाचन करतात.

३.पाठाचे पूर्ण वाचन झाल्यानंतर परत एक एक वाक्य वाचून त्यातील अर्थ न समजलेले शब्द शब्द्कोशात शोधतात.

जे शब्द त्यांच्याजवळील शब्द्कोशात नसतील ते वहीत तक्त्याच्या स्वरूपात (word board activity) लिहितात व त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी माझ्याकडे येतात.

४.Word board मधील शब्दांचा अर्थ माझ्याकडून समजून घेतल्यानंतर वहीत लिहून घेतात. या व शब्द्कोशातील शब्दांच्या अर्थांच्या आधारे पाठातील प्रत्येक वाक्यांचा अर्थ स्वतः लावतात व मला सांगतात...जिथे चुक झाली तिथेच शक्यतो त्यांच्याच मदतीने दूर करण्याचा माझा प्रयत्न असतो...आणि अनुभव असा आहे की मुलेच परस्परांच्या मदतीने चुक दुरुस्ती करून घेतात...क्वचितच ते याकामी माझी मदत घेतात.

५.पाठातील प्रत्येक वाक्यांचा अर्थ सांगून झाल्यानंतर परत सबंध पाठ वाचून काढतात...व पाठाचा समग्र आशय कथन करतात.


गतवर्षी या विद्यार्थ्यांना हसत खेळत ताणविरहित वातावरणात gramatical sentence constructions सुत्रांच्या मदतीने अर्थपूर्ण वाक्यनिर्मितीचा सराव करून घेतला होता...त्याचे उपयोजन पाठातील वाक्यांचा अर्थ आणि एकंदरीत संपूर्ण पाठ समजून घेण्यासाठी माझे विद्यार्थी करीत आहेत असे माझे निरिक्षण आहे.

*गतवर्षी विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण  वाक्यनिर्मितीसाठी पुढील Gramatical Senetense Construction सूत्रे अभ्यासली होती.*

१.S+V1+O 
२.S+V2+O
३.S+shall/will+V1+O
४.S+is/am/are+V4+O
५.S+was/were+V4+O
६.S+shall be/will be+V4+O
७.S+has/have+V3+O
८.S+had+V3+O
९.S+shall have/will have+V3+O
१०.S+has been / have been+V4+O
११.S+had been+V4+O
१२.S+shall have/will have+been+V4+O

ही सूत्रे शिकत असताना विद्यार्थ्यांना ताण येणार नाही याची पुरेपुर काळजी मी घेतली होती.याबाबत सविस्तर वर्णन पुढे दिलेले आहे.
गतवर्षी इयत्ता ३री, ४थी व ५वीच्या विद्यार्थ्यांनी एकुण इंग्रजीतील १२ Grammatical Senetense Constructions अभ्यासल्या होत्या.
हा व्याकरणाचा भाग असल्याने प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना नियमादि बाबी समजावून सांगणे तसे अवघड काम असल्याची जाणीव होतीच परंतू इंग्रजी पाठ्यपुस्तकातील गद्यपाठ शिक्षकानेच पारम्पारिक पद्धतीने म्हणजे शब्दार्थ लिहून देवून ते मुलांना घोकंपट्टी करायला सांगणे तथा समग्र पाठाचे स्वतःच भाषांतर करून आशय कथन करण्यापेक्षा वा समजावून सांगण्यापेक्षा विद्यार्थ्यांनाच स्वयंअध्ययन करून शब्दांचे अर्थ शब्दकोशातुन स्वतः शोधण्याची व तो पाठ/घटक समजून घेण्याची/समजावून सांगण्याची सवय लागली तर ते भाषा शिकण्या/समजून घेण्याच्या अंगाने अधिक परिणामकारक ठरेल असे मला वाटले व पूर्ण विचारांती इंग्रजी वाक्यरचनेची १२ सूत्रे (Sentence Construction formulae /Tenses) शिकण्यास / समजून घेण्यास व त्यायोगे वाक्यनिर्मिती करता येण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम मी हाती घेतले.हे करत असताना व्याकरणातील कोणत्याच संज्ञांचा (SUBJECT,OBJECT, VERB इत्यादि..) उल्लेख मुद्दाम करायचा नाही असे ठरवले.शिकणं निरस व कंटाळवाणं होऊ नये हाच यामागील हेतू.

माझ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासलेली इंग्रजी वाक्यराचनेची १२ सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
त्यातील पाहिले सूत्र [ S+V1+O ] शिकण्यासाठी वर्गात केलेल्या प्रयत्नांचा विस्तृत उहापोह या post मध्ये करीत आहे...आपले अभिप्राय अपेक्षित आहेत.
---------------------------------------------------
Sentence construction formulae
---------------------------------------------------
१.S+V1+O 
२.S+V2+O
३.S+shall/will+V1+O
४.S+is/am/are+V4+O
५.S+was/were+V4+O
६.S+shall be/will be+V4+O
७.S+has/have+V3+O
८.S+had+V3+O
९.S+shall have/will have+V3+O
१०.S+has been / have been+V4+O
११.S+had been+V4+O
१२.S+shall have/will have+been+V4+O

यातील पहिली रचना (S+V1+O) आम्ही अशी शिकलोत.
सर्वप्रथम मुलांना माहीत असलेले मुख्य कृती/क्रियादर्शक इंग्रजी शब्द (मुख्य क्रियापदाचे पहिले रूप-V1) मराठी अर्थासह (त्यांनाच विचारून) एका खाली एक अशा क्रमाने फळ्य़ावर लिहून घेतले.

उदाहरणार्थ-
---------------
   [V1]
---------------
eat/eats ,-खातो/खाते/खातात
go/goes ,-जातो/जाते/जातात
write/writes,-लिहितो/लिहिते/लिहितात
read/reads,-वाचतो/वाचते/वाचतात
walk/walks-चालतो/चालते/चालतात
Come/comes-येतो/येते/येतात
Play/plays-खेळतो/खेळते/खेळतात
Drink/drinks-पितो/पिते/पितात
make/makes-बनवतो/बनवते/बनवतात
Take/takes-घेतो/घेते/घेतात
Cut/cuts-कापतो/कापते/कापतात
Open/opens-उघडतो/उघडते/उघडतात
Close/closes-बंद करतो/करते/करतात

मुद्दाम eat म्हणजे 'खाणे' ऐवजी 'खातो/खाते/खातात'...go म्हणजे 'जाणे' ऐवजी 'जातो/जाते/जातात' याप्रमाणे सर्व क्रियादर्शक शब्दांचे (V1s चे) अर्थ फळ्यावर लिहिलेले होते. त्यामुळे अर्थपूर्ण वाक्यनिर्मिती करणे सोपे जाणार होते कारण वाक्ये लिहिताना वा बोलताना आपण 'खाणे' किंवा 'जाणे' असे शब्दप्रयोग करीत नाही.

वरीलप्रमाणे यादी करून "ह्या सर्व शब्दांना V1 म्हणायचं"..असे सांगितले आणि शीर्षस्थानी "V1" लिहून सबंध यादी चौकटीत बंद केली...
आता वरील शब्दांच्या संदर्भाने मी काही प्रश्न मुलांना विचारले.त्यापैकी एक पुढे दिला आहे.
उदाहरणार्थ-

१.'कोण' जातो ?
....(मुलांचे उत्तर- 'मी' जातो...'तो' जातो...ती जाते...ते जातात...'रवी' जातो...आरती जाते...आम्ही जातो...)

...मग मी 'मी' साठी इंग्रजी प्रतिशब्द 'I' फळ्य़ावर लिहिला.
(अर्थातच मुलांना परिचित असलेल्या शब्दांचीच एकाखाली एक अशी क्रमवार यादी करून शीर्षस्थानी 'S' लिहिले व सबंध यादी चौकटीत बंद केली.

मुलांनी " 'कोण' जातो ? "या प्रश्नाचे उत्तरादाखल सांगितलेल्या सर्व मराठी शब्दांना इंग्रजी प्रतिशब्दांसह तयार केलेली नमुना यादी पुढे देतोय.
-------------
 *[S]*
--------------
मी-I
तो-He
ती-She
ते/त्या/ती-They
आम्ही/आपण-We
रवी-मुलाचे/माणसाचे नाव
आरती-मुलीचे/स्त्रीचे नाव

त्या
दि.

अशाप्रकारे आता फळ्यावर *'V1' व 'S'* या दोन शब्दयाद्या लिहिल्या गेल्या.

आता फळ्यावर *S+V1+O* हे सूत्र लिहिले आणि मुलांना वर लिहिलेल्या *'S' व 'V1'* च्या यादीतील शब्द या सूत्रात योग्य क्रमाने लिहायला सांगितले.
मुलांनी सुत्रातील क्रमानुसार *S व V1* च्या यादीतून योग्य शब्द निवडून अचूक वाक्यरचना केली.
पण O च्या जागी काय लिहायचे हे आधी सांगितलेले नसल्याने मुले थांबलीत..'O' म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी मी *'S+V1'* या क्रमाने विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या अपूर्ण वाक्याच्या अनुशंगाने एक प्रश्नावली तयार केली.त्यातील एक प्रश्न उदाहरणादाखल पुढे देतोय.

मुलांनी *[S+V1]* या शब्दक्रमाने लिहिलेले वाक्य होते.
*I go*...(मी जातो/जाते.)

मी विचारलेला प्रश्नावलीतील मराठी प्रश्न होता..."'कोठे' जातो ?"
मुलांनी विविध उत्तरे दिलीत.
उदा.शाळेत जातो/जाते.
बाजारात जातो/जाते/
कायगावला जातो/जाते...इत्यादि.

ज्यावेळी पहिले उत्तर आले 'शाळेत जातो/जाते' तत्क्षणीच मी
फळ्यावर *I go*नंतर *to school*..हा शब्दसमुह लिहिला.(to,for,at,on,in under....इत्यादि prepositions चे अर्थ वेळोवेळी कृतियुक्त अध्ययन अनुभवांच्या माध्यमातून पहिल्या सत्रातच स्पष्ट केलेले होते...याविषयी स्वतंत्र लिहिनच.)

आता फळ्या वर वाक्य लिहिले गेले...
*I go to school*....(मी शाळेत जातो/जाते किंवा शाळेला जातो/जाते.)

मग मी मुलांना विचारले,"सूत्रात बघून मला सांगा या वाक्यातील *'to school'* या शब्दसमुहाला आता तुम्ही काय म्हणाल ?"
मला अपेक्षित असलेले उत्तर मुलांकडून आले,"सर, *'to school'* हा या सुत्रातील *'O'* आहे."

इथे मुलांचे पूर्वज्ञान होते...फळ्यावरील *'S'* *'V1'* यादीतील शब्द.
त्यामुळे सुत्राखाली लिहिल्या गेलेल्या वाक्यातील *I*(S) *go* (V1) नंतर लिहिलेला to school हा शब्दसमूह नक्कीच *'O'* असणार हे त्यांना निरिक्षणातून लक्षात आले होते.

त्यानंतर वरील वाक्यात *V1* (go)  व *O* *(to school)* कायम ठेवून केवळ' I 'बदलून S च्या यादीतील दुसरे शब्द वापरून विद्यार्थ्यांना वाक्यरचना करावयास सांगितले.
विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे वाक्ये लिहिलीत.
१.I go to school....मी लिहून दाखवलेले मुळ वाक्य.
२.He goes to school....विद्यार्थ्यांनी मी लिहिलेल्या मुळ वाक्यातील ' I ' हा *'S'* बदलून त्याजागी ' *He* ' हा *S* वापरून लिहिलेले वाक्य.
*३*.She goes to school....(She चा वापर)
*४*.They go to school...(They चा वापर)
*५*.Ravi goes to school.(मुलगा/पुरुषाच्या नावाचा वापर)
*६.*Arati goes to school.(मुलगी/स्त्रीच्या नावाचा वापर)

याप्रमाणे विविध इंग्रजी वाक्ये मराठी भाषांतरासह लिहिली.

[ यात *go*  व *goes* किंवा *cut व cuts* यापैकी कोणते रूप कोणत्या *S* पुढे वापरायचे हे समजण्यासाठी आधीच काही तक्ते तयार करून मुलांना अभ्यासण्यासाठी दिलेले होते.
उदाहरणार्थ- 
*I go / I cut*
*You go / You cut*
*We go / We cut*
*They go / They cut*

*He goes / He cuts*
*She goes / She cuts*
*It goes / It cuts*
*Ravi goes / Ravi cuts*
*Aarati goes / Aarati cuts ]*

त्यानंतर वाक्यातील *S* कायम ठेवून *V1* व वाक्याला अर्थपूर्णता येईल असा *'O'* वापरून विद्यार्थ्यांकडून नियमितपणे वाक्यनिर्मिती करून घेत गेलो.मुले आनंदाने हे सारं करीत होती...अर्थपूर्ण वाक्य लिहिलेल्या  वह्या रोज मला दाखवित होती...आताही हा नित्यक्रम सुरूच असतो...आनंदाने शिकलोत आम्ही _*S+V1+O*_ही पहिली वाक्यरचना...आणि त्यापुढील उर्वरित ११ वाक्यरचनाही..!

पाठ्यपुस्तकातील *मुख्य क्रियापदे [V1] व त्यांची उर्वरित ३ रूपे *[..V2..V3..V4]*यांचेही तक्ते मी स्वतः तयार केले तसेच विद्यार्थ्यांकडूनही तयार करून घेतले..वर्गाच्या भिंतीवर डकवले...रोज वर्गात आल्यावर फावल्या वेळेत माझे विद्यार्थी या तक्त्यातील शब्द अभ्यासतात..व उर्वरित ११ वाक्यरचनेच्या सुत्रांच्या मदतीने अर्थपूर्ण वाक्यांची निर्मिती करतात...पाठ्यपुस्तकात असलेल्या गद्यपाठातील वाक्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी व एकंदरीत सबंध पाठाचा आशय समजण्यासाठी शिकलेल्या या साऱ्या बाबींचा उपयोग त्यांना होत आहे...हे मी सध्या अनुभवतोय.

अभिप्रायाच्या प्रतिक्षेत-

*गजानन बोढे,सहशिक्षक, जि.प.प्रा.शा.भानुसेवस्ती, ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद.*

Saturday 26 March 2016

सुलभक:गजानन बोढे,प्रा शा भानुसेवस्ती ता. सिल्लोड,जि.औरंगाबाद.


गत दोन दिवसांपूर्वी आमच्याच केंद्रातल्या एका शाळेतील सहशिक्षिका मुलांचे आतापर्यंतचे शिकणे समजून घेण्यासाठी माझ्या शाळेत आल्या होत्या. योगायोगाने विठ्ठलभाऊ (विठ्ठलराव वहाटुळे...वस्तीतील एक प्रतिष्ठित नागरिक) शाळेत काही कामानिमित्त आलेले. त्यावेळी आतापर्यंत मुलं जे काही शिकलीत त्याचे प्रात्यक्षिक मुलांच्या कृतियुक्त सहभागातून मी शाळाभेटीला आलेल्या त्या मॅडमना दाखवत होतो. विठ्ठलभाऊ कुतूहलाने हे सारं बघत होते. इयत्ता १ ली ची मुलं दशकोटीपर्यंतच्या संख्या सहज वाचत होती.. इतकेच नाही तर दिलेल्या कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकांच्या स्थानिक किंमती सांगणे व लिहिणे. विस्तारित रूपात संख्येची मांडणी करणे.. दिलेल्या दोन संख्यांमध्ये तुलना करून लहानमोठेपणा ठरवणे. योग्य संकेतचिन्हे वापरून संख्यामध्ये केलेली तुलना वाचून दाखवणे. हातच्याची व बिनहातच्याची बेरीज व वजाबाकी करणे. दिलेल्या संख्येच्या मागची व पुढची संख्या अचूक सांगता येणे. चढता उतरता क्रम. संख्यांची कहाणी तयार करणे. इत्यादी कृती मुलं सहज व सफाईदारपणे करत होती. हे सारं बघून विठ्ठलभाऊ प्रभावित झाल्याचे दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव सहज उमटून दिसत होते. अशाप्रकारे आपल्या व्यस्त दिनचर्येतून सवड काढत कधी नव्हे ते त्यादिवशी माझ्या शाळेत तब्बल एक तास बसून आमच्या विद्यार्थ्यांचे शिकणे त्यांनी अनुभवले. शाळाभेटीला आलेल्या मॅडमसह विठ्ठलभाऊंनीदेखील मुलांचे व आम्हा गुरुजींच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले होते. ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● या पार्श्वभूमीवरच आजचा प्रसंग इथे share करावासा वाटतोय. ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● सध्या सकाळ पाळीत शाळा सुरू आहेत. नेहमीप्रमाणे आज १२.३० वाजता शाळा बंद करून मुलं आणि आम्ही दोन्ही शिक्षक घरी जायला निघालो.दुचाकीवर बसलो देखील..(आम्ही निघेपर्यंत एकही विद्यार्थी घरी जात नाही..निघताना bye करण्याची सवय मुलांना लागलेलीय..त्यामुळे सर्वजण आम्ही निघण्याची वाट पाहत शाळेच्या आवारातच थांबलेली होती.) तितक्यात वर ज्यांचा उल्लेख केलाय ते विठ्ठलभाऊ वहाटुळे एका पाहुण्याला सोबत घेऊन शाळेच्या आवारात आले व म्हणाले, "आमच्या पाहुण्याला आपल्या शाळेत चाललेला कार्यक्रम दाखवा बरं सर..!" (मुलांच्या सुलभ शिकण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या आमच्या कामाचा उल्लेख विठ्ठलभाऊंनी 'कार्यक्रम' असा केलेलाय...) अण्णासाहेब फुके असे त्या पाहुण्याचे नाव असून मूळ गाव टाकळी. (माझ्या शाळेची वस्ती टाकळी गावाचाच भाग). औरंगाबाद येथील एका खासगी माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. विठ्ठलभाऊंच्या म्हणण्याला प्रतिसाद देत आम्ही दोन्ही गुरूजी बसल्या गाडीवरून उतरलो अन् पोरांना वर्गाची दारे उघडायला सांगितली. पोरंही जाम खुश होती...(जिल्हा नियोजनानुसार गत सोमवारी शेजारील तालुक्याच्या शिक्षकांनी केलेल्या शाळाभेटीच्या पार्श्वभूमीवर मुलांना मी तसे सांगूनच ठेवलेलेय कि यापुढे तुमचे शिकणे बघण्यासाठी कोणीही कधीही येऊ शकेल..तेव्हा तुम्ही या साऱ्या प्रसंगांना आत्मविश्वासाने सामोरं जायला हवं... त्यामुळेही मुलांना आंनद झालेला असावा कदाचित..असो!) दोन दिवसांपूर्वी मुलांनी आतापर्यंत शिकलेल्या ज्या ज्या बाबींचे सादरीकरण शाळाभेटीला आलेल्या मॅडमसमोर केले होते त्याच बाबी आज आलेल्या पाहुण्यासमोरही (अण्णासाहेब फुके सरांसमोर) केले. आत्मविश्वासाने मुलांनी आतापर्यंत शिकलेल्या सर्व बाबी त्यांच्यासमोर मांडल्या. हे सारं पाहून अण्णासाहेब फुके सर अचंभित झाले व मुलांचे कौतुक म्हणून खूष होऊन १०० रुपयांची नोट माझ्या हाती त्यांनी टेकवली आणि म्हणाले, "मुलांसाठी माझ्याकडून उद्या खाऊ घेऊन या..!" मुलांना मी ती नोट दाखवून म्हटले, "या सरांनी दिलेल्या या १०० रुपयातुन तुमच्यासाठी काय आणू...?" मुलं म्हणालीत, "सर,आम्हाला नकोत ते पैसे..आम्हाला खाऊदेखील नकोय..!" "मग काय करू या पैशाचं तुम्हीच सांगा..!" ....मुलांना मी केलेला प्रश्न. "सर,तुम्ही रविवारच्या वर्गाला येताना गाडीत पेट्रोल टाकून आणा...!" -मुलांचा प्रतिसाद. .....गेल्या काही दिवसांपासून मी रविवारी वर्ग घेतोय याची जाणीव मुलांना असल्याचे पाहून बरे वाटले...रविवारी वर्ग घेतोय म्हणून त्यासाठी येणारा गाडीचा पेट्रोल खर्च मुलांच्या कौतुकापोटी कोणी दिलेल्या रकमेतुन निश्चितच मी करणार नाही...मीच काय काम करणारा कोणताच गुरूजी असा विचार कदापि करणार नाही. आतापर्यंत माझ्या सवडीप्रमाणे ज्या ज्या रविवारी वर्ग घेतलेले आहेत त्या त्या प्रत्येक रविवारी मुलं आंनदाने हजर राहताहेत...मी दिलेल्या वेळेआधीच मुलं शाळेच्या आवारात येऊन राहतात. माझ्या लहानपणीही माझे प्राथमिक शाळेतले गुरुजी रविवारी तसेच दिवाळीच्या सुट्टयांतदेखील वर्ग घेत असल्याचे आठवतेय...पण त्या वर्गांना उपस्थित राहण्याची सक्ती व धाक असायचा...इच्छा असो वा नसो हजर राहावंच लागायचं...कारण नाही उपस्थित राहिलं वर्गाला कि हातावर वळ उमटेपर्यंत 'रूळ' बसायचे हमखास... शिक्षेच्या भीतीपोटी/शिक्षा टाळण्यासाठी नाईलाजाने सुट्टीच्या दिवशीचे वर्ग करत होते बहुतांश विद्यार्थी. ...पण माझ्या विद्यार्थ्याना आंनद वाटतोय सुट्टीच्या दिवशीही शाळेत येण्याचा...! कोणताही धाक नाही कि सक्ती नाही...! यालाच शाळेविषयीची आवड किंवा ओढ म्हणत असावे कदाचित... नाही का..? feeling very happy & proud with my students...󾌵...

Saturday 27 February 2016

सुलभक:गजानन बोढे,स शि.जि.प.प्रा.शाळा भानुसेवस्ती.ता. सिल्लोड. जि.औरंगाबाद.


मुलं स्वतः शिकत आहेत ..!
"...'चमफुल्या' (चिंचोके फोडून तयार झालेले दोन सममीत भाग) वापरून Addition व Subtraction ची उदाहरणे तयार केलीत उत्तरे काढलीत आणि वहीतही उतरवून घेतलीत...!" - इयत्ता १ ली २ री.

  उदाहरणार्थ- 10 चमफुल्याचा फासा जमिनीवर टाकला आणि 6 चमफुल्या पांढरा पृष्ठभाग वर व 4 चमफुल्या काळा पृष्ठभाग वर या रूपात पडल्या तर
6+4 = 10 किंवा 4+6 = 10 असं बेरजेचं उदाहरण तयार होईल.
तसंच मोजून 10 चमफुल्याचा फासा हातात घेतला वहीत लिहिले 10..
फासा जमिनीवर टाकल्यावर समजा 4 काळ्या किंवा 6 पांढऱ्या पृष्ठभागाच्या चमफुल्या पडल्या असतील तर वहीत लिहिलेल्या 10 च्या पुढे वजाबाकीचे चिन्ह लिहून अनुक्रमे 4 किंवा 6 लिहून पुढीलप्रमाणे वजाबाकीची उदाहरणे तयार होतील.
 👉10 - 4 = 6
👉10 - 6 = 4
 4 काळ्या किंवा 6 पांढऱ्या बाजूला काढून घ्यायच्या (कमी करायच्या) व उरलेल्या मोजून उत्तर लिहायचे.

*मी 10 'चमफुल्या'चा फासा विद्यार्थ्यांच्या घोळक्यात सहेतुकपणे टाकला व बाजुला सरून मुलं आता काय करतील हे उत्सुकतेने बघत राहिलो.
*मुलांनी काही चमफुल्या पांढऱ्या तर काही काळ्या पडलेल्या आहेत असे सांगितले. (पोरं विशिष्ट चौकटीचा खेळ खेळण्यासाठी चमफुल्याचा फासा म्हणून वापर करत असल्याने ते त्यांना सहज सांगणे शक्य झाले... हवं तर हे त्यांचं पूर्वज्ञान मानायला हरकत नसावी..)
*चमफुल्याचे रंगानुसार वर्गीकरण केले..(विद्यार्थ्यांनीच काळ्या व पांढऱ्या चमफुल्या वेगवेगळ्या मांडल्या) इथून माझी 'सुलभक' म्हणून भुमिका सुरू झाली.

माझी सुचना-"जर मला Addition करायची/मांडायची असेल तर मी काय करायला हवे..?"
विद्यार्थी प्रतिसाद-"काळ्या व पांढऱ्या चमफुल्या एकत्रित करून मोजाव्या लागतील..!"

माझी सुचना-"एकत्रित करा मोजा व Addition वहीत मांडा..!" वरील उदाहरणाच्या संदर्भात मुलांनी 6 पांढऱ्या चमफुल्या होत्या म्हणून वहीत 6 ही संख्या लिहिली.. त्यापुढे '+' हे चिन्ह देवून 4 काळ्या चमफुल्या म्हणून 4 ही संख्या लिहिली.. माझ्या सुचनेला प्रतिसाद म्हणून काळ्या पांढऱ्या एकत्रित मोजून आलेले उत्तर म्हणून '=' चिन्ह लिहून त्यापुढे 10 ही संख्या मांडली.

अशाप्रकारे त्यांच्या वहीत '6 + 4 = 10' हे Addition चं उदाहरण लिहिलं गेलं...
अशाच स्वरूपाच्या कृतीक्रमानुसार विद्यार्थ्यानी Subtractions ची उदाहरणे वहीत मांडली...
Subtraction करताना मुलांकडून आलेला प्रतिसाद पुढीलप्रमाणे होता ".....एकूण किती चमफुल्याचा फासा होता ते मोजून संख्या लिहाव्या लागतील... त्यापैकी किती पांढऱ्या किंवा काळ्या चमफुल्या पडल्या ते मोजून बाजूला काढाव्या/कमी कराव्या लागतील... शेवटी किती पांढऱ्या किंवा काळ्या चमफुल्या उरल्यात ते मोजून आलेली संख्या उत्तर म्हणून लिहावी लागेल...!"

 (...अर्थातच Addition,,Subtraction + व - sign, = sign आणि या साऱ्यांचा वापर करून आडव्या मांडणीत Addition व Subtraction कशी मांडायची याचे पूर्वज्ञान २ रीच्या मुलांना होतेच...त्यांचेच पाहून तथा गरजेनुसार मी केलेल्या मार्गदर्शनातुन १ लीची मुलंही ते शिकलीत.)

-गजानन बोढे,स शि.जि.प.प्रा.शाळा भानुसेवस्ती.ता. सिल्लोड. जि.औरंगाबाद.

Tuesday 23 February 2016

सुलभक:गजानन बोढे, जि.प.प्रा.शाळा भानुसेवस्ती,ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद

●●●COMPARISON●●●
 Std 1st & 2nd...Semi English.

या संबोधाच्या सुलभीकरणासाठी फरशीवरील पुढील रेखाटनाची मदत झाली.
【】 Less than 【】
【】 Greater than【】
【】 is equal to 【】  
  मुलांना वरील रेखाटने असलेल्या फरशीजवळ घेऊन गेलो.काय शिकणार आहोत याची कोणतीही कल्पना जाणीवपूर्वक मी मुलांना दिली नाही. मुलांना मी जे करणार आहे त्याचे निरीक्षण व मी जे बोलणार आहे ते काळजीपूर्वक ऐकण्याची सुचना करून पुढील कृती करायला मी सुरुवात केली..
मुलं उत्सुकतेने हे सारं बघत होती. कृतीक्रम पुढीलप्रमाणे
👇
 ●पहिल्या रेखाटनाच्या डाव्या चौकटीत काही कवड्या ठेवल्या... त्यापेक्षा जास्त कवळ्या उजव्या चौकटीत ठेवल्या...आणि पुढीलप्रमाणे वाचले... "【】 is less than 【】
●दुसऱ्या रेखाटनाच्या डाव्या चौकटीत काही कवळ्या ठेवल्या त्यापेक्षा कमी कवळ्या उजव्या चौकटीत ठेवल्या... आणि वाचले. 【】is greater than【】
 ●तिसऱ्या रेखाटनाच्या डाव्या चौकटीत काही कवळ्या ठेवल्या.. तितक्याच कवळ्या उजव्या चौकटीत ठेवल्या...आणि वाचले... "【】 is equal to【】
" बराच वेळ अशा पद्धतीने तीनही रेखाटनाच्या प्रत्येक चौकटीतील कवळ्यांची संख्या बदलून वाचन करत गेलो व पाठोपाठ पोरांनाही म्हणायला सांगितले.
पुरेसा वाचन सराव झाल्यानंतर पोरांना तीन्ही रेखाटनाच्या विविध चौकटीत मांडलेल्या कवळ्यांचे निरीक्षण नोंदवायला सांगितले.
 पोरांनी नोंदवलेली निरीक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
 👉[पहिल्या रेखाटनाबाबत मुलांनी नोंदवलेले निरीक्षण] ◆डाव्या चौकटीतील कवळ्यांची संख्या उजव्या चौकटीतील कवळ्यांच्या संख्येपेक्षा कमी आहे.
 👉[दुसऱ्या रेखाटनाबाबत मुलांनी नोंदवलेले निरीक्षण] ◆डाव्या चौकटीतील कवळ्या उजव्या चौकटीतील कवळयांपेक्षा कमी आहेत.
 👉[तिसऱ्या रेखाटनाबाबत मुलांनी नोंदवलेले निरीक्षण] ◆डाव्या आणि उजव्या चौकटीतील कवळ्यांची संख्या सारखी आहे. पुरेसा वाचन सराव झालेला असल्याने मुलांनी वरील सर्व रेखाटनाच्या चौकटीत ठेवलेल्या कवळ्यांच्या संख्यांच्या आधारे पुढीलप्रमाणे सहज वाचन केले...
【】 Less than【】
【】greater than【】
【】 Equal to 【】

 उच्चारलेल्या शब्दांच्या अर्थाचे आकलन झाले किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी पुढील प्रश्न विचारले.
 1) आपण 【】Less than【】 असे कां बरं वाचले?
मुलांचा प्रतिसाद-"कारण कि डाव्या चौकटीत कमी कवळ्या आहेत उजव्या चौकटीतील कवळ्यांपेक्षा..!"
 2) आपण 【】Greater than 【】 असे कां बरं वाचले?
मुलांचा प्रतिसाद-"कारण कि डाव्या चौकटीत जास्त कवळ्या आहेत उजव्या चौकटीतील कवळ्यांपेक्षा..!"
 3) आपण 【】Equal to【】 असे कां बरं वाचले? मुलांचा प्रतिसाद-"कारण कि डाव्या व उजव्या चौकटीतील कवळ्यांची संख्या सारखीच आहे..!"

 (या ठिकाणी 'Less than' म्हणजे 'पेक्षा कमी'...Greater than म्हणजे पेक्षा अधिक...आणि Equal to म्हणजे सारखे/समान...हे पोरांच्या सहज लक्षात आले...मला पोरांना मराठी प्रतिशब्द सांगावा लागला नाही..निरीक्षणातून मुलांनी वाचलेल्या/उच्चारलेल्या या शब्दांचा अर्थ स्वतः शोधला)
अशा पद्धतीने आम्ही COMPARISON शिकलोत.

😊 -गजानन बोढे,स.शि.जि.प.प्राथ.शाळा भानुसेवस्ती टाकळी जि.


ता. सिल्लोड जि. औरंगाबाद.